• शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो. सिंधु घाटी संस्कृतीपासून भारतीय कृषीचे अस्तित्व गणले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात व्यापार रोजगार व जीवन जगण्याचे एक साधन म्हणून शेतीला असणारे महत्त्व आज देखील कायम आहे. कधीकाळी पारंपारिक पद्धतीने केली जाणारी शेती, आज आधुनिकतेकडे वळण घेते आहे. भारतीय दृष्टिकोनातून या आधुनिकतेचा विचार केला तर असे दिसून येते की, 1960 च्या नंतर देशात कृषी क्षेत्रात आलेली हरितक्रांती हा मैलाचा दगड ठरलेला आहे. याच्या पुढे गेल्यास असे दिसून येते की सन 2007 मध्ये देशाच्या सकल घरगुती उत्पादनात कृषी व संबंधित क्षेत्राचा वाटा हा 16.6 टक्के होता. याच काळात देशात 52 टक्के लोकांचा सहभाग हा पूर्णपणे कृषी क्षेत्रात होता. हा वाटा सन 2018-19 मध्ये देशाच्या 2.7 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा वाटा सुमारे 15.9 टक्के आणि रोजगाराच्या 49 टक्के आहे. भारतीय लोकांचे कृषी वरील अवलंबित्व आणि देशाच्या आर्थिक विकासात कृषी क्षेत्राचे योगदान हे दिवसेंदिवस घटत चालले आहे. या देशाचे आतापर्यंतच्या कृषी धोरणांचा प्रभाव व शेतकऱ्यांची होत असलेली कुचंबणा याचा अभ्यास करणे हा, या शोध निबंधाचा महत्त्वाचा उद्देश आहे.